सामाजिक उपक्रम

धान्यप्रदान

एकमेकांना मदत करण्याची वृत्ती निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी मुलांकडून धान्य गोळा केले जाते. हे धान्य वनवासी कल्याण आश्रमातील मुलांना प्रदान करण्यान येते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे धान्यप्रदान करण्यात येते.

स्वच्छता अभियान

२ ऑक्टोबर २०१४ रोजी नरेंद्र मोदी स्वच्छता अभियाना अंतर्गत शिक्षिका व सेविका यांनी श्रमदान करून शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. मुलांनाही स्वच्छतेचे महत्त्व समजावे म्हणून मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली. निंबाळकर तालीम गणपती मंडळासमोर स्वच्छतेवर आधारित मुलांनी नाट्यीकरण करून सामाजिक प्रबोधन करण्यास हातभार लावला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमांतर्गत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमांतर्गत केरळमधील दुष्काळग्रस्तांसाठी शिक्षकांनी निधी संकलन करून मदतीचा हातभार लावला.

ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा

२०१६ साली ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा यामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम मुलांना समजावून दिले तसेच पालकसभा घेऊन पालकांनाही समजावून सांगितले. याचे महत्त्व समाजापर्यंत पोहचवण्यासाठी मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली. पालक आणि रिक्षावाले काकांना राखी बांधून ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याचे योग्य प्रकारे विभाजन करून विल्हेवाट करण्याची सामुदायिक शपथ घेण्यात आली. यासाठी मुलांनीही आपल्या घरी असणारा ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा शाळेत जमा केला होता.

स्वदेशी वस्तू

२०१७ साली स्वदेशी वस्तू वापरून विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालावा यासाठी समाज प्रबोधन करण्यात आले.  राखीपौर्णिमेचे निमित्त साधून मुलांकडून स्वदेशी वस्तूंचा वापर करून राख्या बनवण्यात आल्या आणि त्याचे भेटकार्ड करून स्वदेशी वस्तूंचा वापर करावा हा संदेश देण्यात आला, आणि या राख्या मुलांना घरी देण्यात आल्या. यावेळी रिक्षावाले काकांना देखील हा संदेश देऊन मुलांनी राख्या बांधल्या.

वाहतूक सुरक्षा अभियान

वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत मुलांना लहानपणापासूनच वाहतुकीचे नियम समजावेत यासाठी मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच पालक आणि समाजाने देखील वाहतूक सुरक्षा अंमलात आणावी यासाठी प्रबोधन केले.

योगदिन

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून शाळेत योगदिन साजरा केला जातो. मुलांना योगाचे, व्यायामाचे महत्त्व समजावून सांगून मुलांकडून छोटेसे योग व व्यायाम करून घेतले जातात. दररोज मुलांकडून असे व्यायाम प्रकार आणि योग करून घेतले जातात.

वैदिक पद्धतीने मुलांचे वाढदिवस

जन्म दिवस म्हणजे आनंदाचा गौरव व सौभाग्याचा शुभ दिवस. हा दिवस मुलांना चांगले संस्कार घडवण्यासाठी एक निमित्त व्हावे म्हणून दर महिन्यातील मुलांचे वाढदिवस वैदिक पद्धतीने साजरे केले जातात.

गणेशोत्सव

दरवर्षी रेणुका परिवाराचा गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये समाज प्रबोधनपर विविध विषय घेऊन सजावट केली जाते.

स्वातंत्र्यदिन

मुलांमध्ये देशाबद्दल आदर निर्माण व्हावा, प्रेम जागृत व्हावे, आपल्या देशाबद्दलची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी मोठ्या गटातील मुलांना झेंडावंदन कार्यक्रमासाठी बोलावले जाते.

 

 

Scroll to Top