
नमस्कार
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हि पुण्यातील १६६ वर्ष अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणारी एक नामवंत जुनी शिक्षणसंस्था आहे. या संस्थेच्या अनेक शाळा व महाविद्यालये यापैकी म ए सो पूर्व प्राथमिक शाळा हि पुण्यातील सदाशिव पेठेतील एक नामवंत शाळा आहे.
या शाळेची स्थापना १८ जून १९७९ साली झाली असून गेली ४६ वर्षे, बालपणापासून संस्कारक्षम पिढी तयार करण्यासाठी, अनेक उपकमाद्वारे हि शाळा अविरत प्रयत्न करत आहे. बालवाडी प्रशिक्षण घेतलेल्या, मुलांची आवड तसेच मुलांची मानसिकता समजून घेणाऱ्या अशा उत्तमोत्तम शिक्षकांची परंपरा आपल्या शाळेस लाभली आहे. त्यामुळे मुलांच्या भावी संस्कारक्षम जीवनाचा पाया या शाळेत रोवला जातो.
आपल्या पूर्व प्राथमिक शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या शाळेची १४ वर्गखोल्या असलेली स्वतंत्र आणि प्रशस्त इमारत. तसेच प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र स्वच्छता गृहे, खेळण्यासाठी सुरक्षित अंगण, बालचमूच्या भावविश्वातील निरनिराळ्या पक्षी, प्राणी यांची सजीव वाटतील, अशी चित्रे असणाऱ्या बोलक्या भिंती, वर्गवाणीतून बालसंस्कार, बालवाचनालय, हि शाळेची प्रमुख आकर्षणे!!
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांना हसत-खेळत व प्रत्यक्ष अनुभव देऊन, आणि त्यांनी स्वतंत्र अनुभव घेऊन शिकावे, असे विविध उपक्रम येथे राबवले जातात. म्हणजे प्रकल्पनुरूप पद्धतीने शिक्षण दिले जाते. यातून मुलांना भाषा विषय, गणित विषय, विज्ञान विषय याची तोंडी व लेखी ओळख होते.
मुलांमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व, नाट्याभिनय या कौशल्यांचा विकास होण्यासाठी दहीहंडी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, दिवाळी यासारखे सण-समारंभ, स्नेहसंमेलन, सहल, क्षेत्रभेटी, चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेसस्पर्धा, मातीकाम असे विविध उपक्रम घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाबरोबर कला, नाट्य, संगीत, वक्तृत्व या सर्व क्षेत्रात लहानपणीच तयार होतात.
आजच्या काळात इंग्रजी भाषेचे असणारे महत्व लक्षात घेऊन आपल्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना बालवाडीपासूनच इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या शाळेतील मुले हि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांपेक्षा कुठेही मागे पडत नाही.
विद्यार्थाप्रमाणे पालकांसाठीही पालक स्पर्धा, पालकशाळा, आई-बाबा, आजी-आजोबा पालक मेळावा, पालकांसाठी समुपदेशनपर व्याख्याने, पालक-शिक्षक सहल, असे उपक्रम घेतले जातात. तसेच दर महिन्याला पालकसभा घेऊन पालकांना दर महिन्याचे, आठवड्याचे अभ्यास व खेळ इ. बाबतचे नियोजन दिले जाते व प्रगती सांगितली जाते.
शिक्षक आणि पालक यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे व्हँन- रिक्षावालेकाका. आमच्या शाळेत या सर्व काकानाही प्रत्येक उपक्रमात व स्पर्धेत सहभागी करून घेतले जाते.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व सातत्याने येणाऱ्या नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शालासमिती अध्यक्ष मा सौ आनंदी पाटील, महामात्रा डॉ. मानसी भाटे, श्रीमती चित्रा नगरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारीही बहुमोल सहकार्य व मदत आम्हाला सतत करत असतात.
एक उपक्रमशील शाळा म्हणून आपल्या पूर्व प्राथमिक शाळेचे नाव अभिमानाने घेतले जाते.
—
आपली विश्वासू
सौ मेधा दाते
मुख्याध्यापक
