म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळा हि ४६ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली एक उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिध्द आहे. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी विविध अध्ययन अनुभव द्यावे लागतात. हे अध्ययन अनुभव देण्यासाठी आपली पंचज्ञानेंद्रिय सजग असावी लागतात. यासाठी विविध शैक्षणिक साहित्य, प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष अनुभव यावर भर दिला जातो. तसेच अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सोपी व कृतीप्रदान तसेच मनोरंजक कसे करता येईल यावर भर दिला जातो. २०२० सालापासून सुरु झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम घेतला जात आहे.
यासाठी शाळेत विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर करून मुलांना शिक्षण दिले जाते. जसे कि अक्षर-अंक दृढीकरण पाटी, ग्राममंगलची साधने, २-४ गुणधर्माची साधने, अंकजिना, सळीपेटी मोजणी, गणिती संकल्पना स्पष्ट करणारी साधने, तसेच वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणारी साधने, शब्दवाचन पुस्तके ,चित्रवाचन पुस्तके अशा विविध साधनांचा वापर करून मुलांना हसत-खेळत शिक्षण दिले जाते.
तसेच मुलांना विज्ञानाची गोडी लागावी, वैज्ञानिक अनुभव मिळावे, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा आणि वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट व्हाव्यात यासाठी शिक्षकांच्या देखरेखीखाली मुलांकडून विविध वैज्ञानिक प्रयोग करून घेतले जातात. जसे कि, ज्वलनाला हवेची गरज, मिश्ररंग, जड व हलका, तरंगणे व बुडणे, पारदर्शक व अपारदर्शक, हवेचे विविध प्रयोग असे अनेक प्रयोग करून मुलांना प्रत्यक्ष कृतीचा व अनुभवाचा आनंद घेता येतो.
याचप्रमाणे मुलांचा शारीरिक विकास होण्यासाठी आणि मुलांना अभ्यासाचे दडपण वाटू नये, कमीत कमी वेळात आणि कमी श्रमात मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आपण अभ्यासावर आधारित वेगवगळे खेळ घेत असतो. जसे कि, अक्षर – अंक घर पकडा, अक्षर – अंक शिडी चढणे, भाऊ भाऊ एकत्र या, मोजणीचे विविध खेळ, संकल्पना स्पष्ट करणारे मैदानी खेळ असे अनेक खेळ खेळून मुलांना हसत खेळत अभ्यास करता येतो.
या अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमुळे मुलांच्या मानसिक, भावनिक, शारीरिक विकासात वाढ होण्यास मदत होते. मुलांची एकाग्रता, निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
