शालेय उपक्रम

पालक शाळा
पालकांना शाळेतील विविध उपक्रमांची तसेच शाळेत घेतल्या जाणाऱ्या अभ्यासाची माहिती व्हावी हा हेतू आहे. यामध्ये शाळेत नेमकी मुले काय करतात, तसेच त्यांच्या मानसिक व भावनिक विकासाबाबत माहिती पालकांना मिळते.

आई- बाबा पालक मेळावा आणि आजी
आजोबा पालक मेळावा- पालक प्रबोधिनी उपक्रमाअंतर्गत असे मेळावे घेतले जातात. मुलांच्या समस्यांबाबत अनुभवी व तज्ञ व्यक्ती यांच्याकडून मार्गदर्शन मिळते.
शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा
आपल्या शाळेत वेगवेगळ्या साधनांचा वापर करून हसत-खेळत मुलांना शिक्षण दिले जाते. असेच शिक्षण मुलांना घरी घेता यावे यासाठी घरातील टाकाऊ वस्तूपासून शाळेतील साहित्य कसे बनवता येईल याची शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा घेतली जाते. त्यामुळे मुलांना हसत – खेळत शिक्षण घेण्यास मदत होते.
आनंद मेळावा

मुलांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती व्हावी, खरेदीचा आनंद घेता यावा  यासाठी हा उपक्रम घेतला जातो.

सण - समारंभ

आपल्या मुलांना संस्कृतीची ओळख व्हावी तसेच सण –समारंभ याबाबत माहिती मिळावी यासाठी आपण वर्षभरात येणारे सर्व सण समारंभ पारंपारिक पद्धतीने साजरे करत असतो.

पालक स्पर्धा

पालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच पालकांच्या व्यस्त जीवनातून थोडे बाहेर पडून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात.

शिक्षक सेवक स्पर्धा

शिक्षक सेवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच कामातील त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात.

विद्यार्थी स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यात सभाधीटपणा यावा यासाठी हा उपक्रम घेतला जातो. यामध्ये मुलांच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात.

१. पाठांतर स्पर्धा

२. फॅन्सी ड्रेस स्पर्धा

बाल वाचनालय

मुलांना लहानपणापासूनच वाचनाची गोडी आणि सवय लागावी यासाठी शाळेत बालवाचनालय वर्ग आहे. यात शिक्षककृत अक्षर-चित्र पुस्तके, प्रकल्पानुरूप चित्रांची पुस्तके, चित्रवाचन, चित्ररूप गोष्टी यांचा वापर करून वाचन सराव घेतला जातो.

प्रकल्प पद्धतीवर आधारित उपक्रम

कुटुंब व स्वच्छता, फळ, भाजी, पक्षी, प्राणी, वाहन, झाड, व्यावसायिक असे प्रकल्प घेतले जातात. या प्रकल्पांच्या माध्यमातून मुलांची निरीक्षणशक्ती, एकाग्रता, सभाधीटपणा, व्यक्तिमत्वविकास, स्फूर्ती, आकलनशक्ती , मानसिक व बौद्धिक विकास, पंचज्ञानेन्द्रीय यांचा विकास व्हावा तसेच व्यावहारिक ज्ञान वाढावे यासाठी आपण विविध उपक्रम घेत असतो. तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील विविध गोष्टींचे ज्ञान वाढवण्यास मदत मिळते.

सहल

रोजच्या अभ्यासातून, रोजच्या दिनक्रमातून थोडासा वेगळा अनुभव व आनंद मिळावा म्हणून मुलांना ‘सहल’ या निमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यात नेले जाते.

धुमधमाल कार्यक्रम

सहलीप्रमाणेच पण थोडासा वेगळा उपक्रम म्हणून धुमधमाल  कार्यक्रम घेतला जातो. शाळेतच जम्पिंग जॅक, मेरी गो राउंड, पपेट शो, असे खेळ घेतले जातात. यावेळी मुले अभ्यासाला सुट्टी देऊन या अनोख्या खेळांचा मनमुराद आनंद घेतात.

वार्षिक स्नेहसंमेलन

मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, नृत्य व गाण्याची आवड निर्माण व्हावी, सभाधीटपणा यावा यासाठी दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन घेतले जाते. यामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित गाणी घेतली जातात.

जीवनव्यवहार उपक्रम

मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच स्वतःच्या हाताने खाऊ बनवता यावा यासाठी दर महिन्याला जीवनव्यवहार उपक्रम घेताल जातो. यामध्ये मुलांना सहज बनवता येतील असे खाऊ घेतले जातात. यातून स्वतः बनवलेला खाऊ खाण्याचा आनंद मुलांना मिळतो.

परिपाठ

मुलांवर संस्कार घडवण्यासाठी तसेच मुलांचा शारीरिक व मानसिक विकास घडवण्यासाठी दररोज सकाळी परिपाठ घेतले जातात. लहानपणापासूनच मुलांच्या अंगी सभाधीटपणा वाढीस लागतो.

मुलांसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम

– मुलांच्या सर्वांगीण क्षमतांचा विकास व्हावा, मुलांची पाठांतर क्षमता वाढावी, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी, धीटपणा, गणिताबद्दल भीती कमी व्हावी, स्नायूंचा विकास व्हावा आणि पालक -मुले-शिक्षक यांचा समन्वय साधला जावा यासाठी शाळा दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. ते पुढीलप्रमाणे

  1.  भाषा विकास
  2. शारीरिक विकास
  3. हस्तकला – चित्रकला
  4.  गणनपूर्व संकल्पना व गणित
  5. स्वच्छता व स्वावलंबन
  6. उच्चारांची समस्यापूर्ती आणि भाषाविकास
  7. अवधानक्षमतेची समस्यापूर्ती आणि एकाग्रता
  8. पालक आणि बालक यांच्यामधील संवादाच्या अभावाची समस्यापूर्ती आणि एकाग्रता
  9. खेळ
  10. अध्ययन आणि अध्यापन पद्धतीत शैक्षणिक साधनांचे महत्त्व
क्रीडा स्पर्धा

लहान मुलांचे स्नायू लवचिक असतात. लहानपणातच स्नायुमध्ये कौशल्य प्राप्त करता येते. यासाठी आपण मुलांच्या क्रीडास्पर्धा घेतो. यामध्ये मुलांना सहज व सोपे असे पण आनंद देणारे खेळ घेतले जातात.

Scroll to Top