२०२५-२६

नवागतांचे स्वागत
सुट्टी संपली, शाळा भरली.
म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांचा आजचा पहिला दिवस. मुलं आणि पालक दोघेही खूप उत्साहित होते. शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या समाजसुधारकांकडून स्वागत …. अशी थीम करण्यात आली होती.
शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि म. ज्योतिबा फुले तसेच बालवाडी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ताराबाई मोडक यांची वेशभूषा केलेल्या पालकांनी मुलांना हाताला धरून शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला. मुख्याध्यापिका सौ. मेधा दाते आणि सर्व शिक्षकांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून मुलांचा हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला. सर्व पालक आणि मुलांना एकत्र बसवून सरस्वती स्तोत्र घेतले. मुख्याध्यापकांनी पालकांना NEP बाबत थोडक्यात माहिती सांगितली आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर सर्व पालक मुलांना घेऊन आपापल्या वर्गात गेले. NEP म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चित्ररूप वर्गभिंती चे नूतनीकरण पाहून मुलं आणि पालक खूप खुश झाले.

४६ वा वर्धापनदिन

आज १८ जून , शाळेचा ४६ वा वर्धापन दिन…..
त्यानिमित्ताने मुख्याध्यापिका सौ मेधाताईंनी आपल्या महाराष्ट एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन केले.
मुलांनी पपेट शो आणि प्रोजेक्टर वर बालगीतांचा आनंद घेतला. मुलांना खाऊ म्हणून राजगिरा लाडू दिला. मुलांनी देखील आपल्या शाळेला भरभरून शुभेच्छा दिल्या .

पालखी सोहळा

|| देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ||
|| तेणे मुक्तिचारी साधियेला ||

आज छोट्या वारकऱ्यांनी विठूचा गजर करत शाळेला भक्तिमय केले. आजच्या पालखी सोहळ्यात सर्व मुलं छान वारकरी वेशात आली होती. मुलं खूप उत्साहित होती. मोठ्या गटातील मुलांना विठ्ठल रखुमाई बनवले होते. मुलांच्या रूपात विठ्ठलाचे निस्सिम भक्त … संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई तसेच समर्थ रामदास स्वामी यांनी देखील विठ्ठलाच्या दर्शनाला हजेरी लावली होती.
यावर्षी शाळेत वृक्षदिंडी करण्यात आली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडं लावावीत, झाडं तोडू नयेत, त्यांची काळजी घ्यावी याबाबत मुलांना माहिती दिली. वृक्षदिंडी निमित्त मुलांनी वेगवेगळ्या फुलांची झाडं आणली तसेच छोट्या छोट्या आकर्षक पालख्या देखील आणल्या होत्या.
मुख्याध्यापिका सौ मेधाताईंनी पादुकांची आणि विठोबाची पूजा केली, आरती केली. त्यानंतर पालखीच्या गाण्यावर सर्व मुलांनी ताल धरत विठोबा भोवती रिंगण घातले. प्राथमिक शाळेच्या प्रांगणातून विठुनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. मुलीनी फुगड्या खेळल्या. साखरफुटाण्याचा प्रसाद खाल्ला.

गुरुपौर्णिमा

गुरु माझा दीपस्तंभ, अंधारात मार्गदर्शक ||
ज्ञानरूपी अमृत देई, जीवन करी सार्थक ||

आज गुरुपौर्णिमा …. मुख्याध्यापकांच्या हस्ते व्यास ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापकांनी मुलांना आजच्या दिवसाचे महत्व समजावून सांगितले. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु हा त्याची आई असते आणि त्यानंतर शाळेतील शिक्षक. प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही शिकत असतो म्हणून पालक व शिक्षकांबरोबरच आपले वर्गमित्र हे देखील आपले गुरु आहेत. यासाठी मुलांनी एकमेकांना वाकून नमस्कार केला.
आजच्या दिवसाचे औचित्य साधून…. जून महिन्यात वाढदिवस असणाऱ्या मुलांचे ” वैदिक पद्धतीने होम करून ” साजरे करण्यात आले.
मुलं ही शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी पटकन ऐकतात. म्हणून मुलांचे मोबाईलचे वेड कमी व्हावे यासाठी शिक्षकांनी नाट्यीकरणातून ” मोबाईलमुळे काय वाईट परिणाम होतात ” हे दाखवले. मुलांना हे नाटक इतके भावले की त्यांनी देखील…. मोबाईल बघणार नाही, असे आश्वासन दिले.
शिक्षक, पालक, मित्र हे तर आपले गुरु आहेतच, त्याचप्रमाणे निसर्ग हा देखील आपला गुरु आहे. या निसर्गातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते, हे मुलांना समजावे म्हणून वृक्षदिंडी निमित्त मुलांनी आणलेल्या रोपांना रेणुका स्वरूप शाळेच्या अंगणात मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांबळेबाई उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी मुलांना शाळेतील ” आकाशगंगा ” दाखवली. तेथील सूर्य, चंद्र, ग्रह, तारे पाहून मुलं खूप उत्साहित झाली.
त्यानंतर मुलांनी सर्व शिक्षकांना मुलांनी स्वतः बनवलेले भेटकार्ड तसेच श्रीफळ आणि फूल देऊन त्यांना नमस्कार केला.

स्वातंत्र्यदिन

|| भारत माता की जय ||

७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
आपल्या म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. शाळेतले सगळे छोटे सैनिक पालकांसोबत लवकर उठून झेंडावंदनासाठी आले. शालासमितीच्या महामात्र डॉ. मानसी भाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा झाली.
मुलांना लहान वयातच सामाजिक बांधिलकी जपण्याची सवय लागावी आणि या समाजातील गरजू मुलांसाठी एक मदतीचा हातभार लावता यावा यासाठी दरवर्षी वनवासी कल्याण आश्रम येथे धान्यप्रदान करण्यात येते. यावर्षीदेखील मुलांनी धान्यप्रदानासाठी भरघोस प्रतिसाद दिला.
त्यानंतर…. हम होंगे कामयाब …. हे गीत मुलांनी म्हटले आणि कवायत प्रकार केले. वंदे मातरम् झाले.

उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला….
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी भारत देश घडविला….
जयहिंद !

गणेशोत्सव एक संस्कार

गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा आवडता सण. जवळपास १५ दिवस आधीपासूनच या सणाची तयारी सुरू होते. आरास काय करायची, मूर्ती कशी घ्यायची, वगैरे वगैरे…. पण मूर्ती आपणच स्वतः बनवली तर, त्याची मजा आणि आनंद काही वेगळाच असतो. आणि म्हणूनच आपल्या शाळेत गणेशोत्सव निमित्त पालक आणि विद्यार्थी असा मातीकामातून मूर्ती तयार करणे आणि आपल्या मुलांना एक संस्कार देता यावा म्हणून ….गणेशोत्सव एक संस्कार…. असा उपक्रम घेण्यात आला.
यात बरेच पालक आनंदाने सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका सौ मेधाताईंनी प्रस्तावनेत … मूर्ती बनवताना कशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मनाला आनंद आणि समाधान मिळते तसेच मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी मदत मिळते याचे महत्त्व समजावून सांगितले. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य शाळेतूनच दिले. बाप्पाचे स्मरण करून अर्पिताताईंच्या मार्गदर्शनाखाली पालक आणि मुलांनी बाप्पाची मूर्ती साकारण्यास सुरू केले.
सर्व पालक अगदी भान विसरून मूर्ती घडवत होते. मुलांनी देखील पालकांच्या मदतीने त्यांची स्वतःची एक छोटी मूर्ती तयार केली. त्यानंतर त्या मूर्तीची पूजा करून आरती केली, तसेच गणपतीस्तीत्र पठण केले.काही पालकांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून अत्यंत सुंदर अशा मूर्ती तयार केल्या. मुलांच्या निमित्ताने त्यांना मूर्ती घडवता आली….. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि हा आनंद मूर्तीतील बाप्पाच्या चेहऱ्यावर सुद्धा उतरला होता. सगळ्यांचे बाप्पा खूप सुंदर होते. मेधाताईंनी सर्व पालकांचे आणि मुलांचे खूप कौतुक केले.

      

नवरात्री - शक्ती स्तुती

सर्व मंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थ साधिके ||
शरण्ये त्र्यंबके गौरी | नारायणी नमोस्तुते ||

       शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत शाळेत नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ” शक्ती स्तुती ” सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित असलेले मान्यवर … शालासमिती अध्यक्ष, डॉ. मानसी भाटे, रेणुका स्वरूप शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी कांबळे आणि भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड तसेच सेवा सहयोग संस्था प्रतिनिधी सौ. देविका सरदेशपांडे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा छान वाढली. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेल्या देवीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आलेले सर्व मान्यवर हे आपापल्या गुणांमुळे आणि कार्यपद्धतीमुळे एका उच्च पदावर आहेत. त्यांच्यातील स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा म्हणून आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मेधाताई यांनी त्यांची ओटी भरली.
आपला रेणुका परिवार हा एक संस्कार देणारा, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारा आहे, आणि याची जाणीव सतत आपल्या मनात राहावी यासाठी सर्व शिक्षकांच्या वतीने …. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू. आदर, समजूतदारपणा आणि मैत्री यांच्या आधारावरच आम्ही पुढे जाऊ. शाळेच्या प्रगतीसाठी आमची एकजूट आणि निष्ठा सदैव अढळ राहील…. अशी मेधाताईंनी प्रतिज्ञा घेतली.
नवरात्रीमध्ये देवीच्या प्रत्येक रूपाचे एक वेगळे महत्त्व आहे. ते समजण्यासाठी नवदुर्गांच्या वेशात आलेल्या माता पालकांनी नऊ दुर्गांची ओळख करून दिली. त्यानंतर मोठ्या गटातील मुलींनी सादर केलेल्या देवीच्या गोंधळ नृत्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
रेणुका परिवार मधील सर्व शाळांच्या उज्वल भविष्यासाठी संकल्प करून दुर्गेच्या १०८ नामांचा जप करत हवन करण्यात आले. या दिवशी ललिता पंचमी असल्यामुळे सर्व मान्यवर आणि शिक्षकांनी मिळून शाळेतील सर्व मुलींचे कन्यापूजन केले.

 

दिवाळी कार्यक्रम

आनंद घेऊन दिवाळी आली,
सगळी सृष्टी दिव्यांनी उजळली ||
प्रेमाचा संदेश देऊया सगळ्यांना,
शुभेच्छा मनःपूर्वक तुम्हा सर्वांना॥

       दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, सुख समृद्धीची भरभराट करणारा सण…. आणि हा सण मुलांसाठी द्विगुणित आनंद देणारा असतो. बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत मुलांनी आपल्या मित्रांसमवेत दिवाळी कार्यक्रम छान साजरा केला.
दिवाळी म्हटलं की किल्ला हा आलाच….. म्हणून पालक, शिक्षक आणि मोठ्या गटाच्या मुलांनी मिळून शिवनेरी किल्ला बांधला. तर लहान गट, खेळवाडीच्या मुलांनी पालकांची मदत घेऊन बनवलेले आकाशकंदील आणले. त्यामुळे शाळा अगदी खूप छान सजली. तसेच मोठ्या गटाच्या पालकांनी दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व सांगणारे मॉडेल तयार केले.
बुधवारी सगळी शाळा आकाशकंदील, दिवे, रांगोळी, किल्ला त्यावरील चित्र, माळांनी सजली होती. मोठ्या गटाच्या मुलांनी दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व मुलांना सांगितले. दिवाळीत आपण काय काय करतो, फटाके उडवताना काय काळजी घ्यायची, दिवाळी सुट्टीत काय करायचं, अशा विविध गोष्टी मुलांना शिक्षकांनी समजावून सांगितल्या. दिवाळीची बडबडगाणी म्हणत मुलांनी लाडू चिवडा फराळाचा आनंद घेतला. सगळी मुलं खूप आनंदी होती.

 

वार्षिक सहल

मित्रांच्या संगती … सहल होई मस्त गंमती
गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांची सहल “कमला नेहरू उद्यान” येथे नेण्यात आली होती. थंडीअसूनही सगळी मुलं स्वेटर, कानटोपी, मोजे घालून उत्साहाने आली होती. बागेत गेल्यावर सगळ्या मुलांनी आपल्या मित्रमैत्रिणीसमवेत मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. हिरव्यागार गवतावर अनवाणी पायाने पळणे, उड्या मारणे अशा हालचाली करत खूप मज्जा केली. पडले, धडपडले, आणि लागलं म्हणून रडलेही..पण खेळणं काही थांबवलं नाही. खूप खेळून दमल्यावर थोडी विश्रांती घेऊन गप्पा करत गरम गरम भाताचा आस्वाद घेतला.

Spoiler title

म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत क्रीडासप्ताहाचा उद्घाटन सोहळा बुधवार दि. २१ जानेवारी रोजी आनंदी वातावरणात पार पडला.
चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आणि social media पासून परावृत्त होऊन …. खेळाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक विकास व्हावा आणि मित्रांबरोबर खेळाचा मनसोक्त आनंद घेता यावा या उद्देशाने या क्रीडासप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडासप्ताहाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. सो चे सहाय्यक सचिव आणि म. ए. सो च्या क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. श्री सुधीरजी भोसले यांना आमंत्रित केले होते. तसेच शालासमिती अध्यक्ष मा. श्री. दिलीपजी शेठ आणि शालासमिती महामात्रा मा. श्रीमती. प्रणिता जोगळेकर सुद्धा आजच्या उद्घाटनास उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भोसले सरांच्या हस्ते खेळाचे प्रतीक असणारी मशाल प्रज्वलित करण्यात आली. लहान मुलांनी क्रीडामशाल घेऊन फेरी काढली.
उद्घाटन सोहळ्यात चिमुकल्यांनी क्रीडा पोशाखात तालबद्ध हालचाली करत तालियोग आणि मंडालायोग सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्व मान्यवरांनी या चिमुकल्यांचे खूप कौतुक केले.
या क्रीडासप्ताहात मुलांसाठी विविध मजेशीर खेळांचे आयोजन करण्यात आले असून सर्व मुले मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. क्रीडासप्ताह अजून रंगतदार व्हावा म्हणून पालकांच्या सुद्धा स्पर्धा घेण्यात आल्या. आणि या स्पर्धांना पालकांनी देखील छान प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व पालकांचे सहकार्य लाभले.

Spoiler title

गुरुवार दि. ५ फेब्रुवारी रोजी बक्षीस समारंभ कार्यक्रम छान आनंदात झाला. क्रीडासप्ताहाच्या निमित्ताने हा बक्षीस समारंभ कार्यक्रम होणार आयोजित करण्यात आला होता.
मोठ्या गटाच्या मुलींनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मेधाताई यांनी शाळेच्या सर्व उपक्रमांचा आढावा घेत क्रीडासप्ताहाचे महत्व पालकांना समजावून सांगितले.
मुलांना मनसोक्त खेळता यावे आणि पालकांना देखील पुन्हा लहान होऊन खेळाचा आनंद घेता यावा, हा उद्देश पूर्ण करण्यासाठी क्रीडासप्ताहाच्या निमित्ताने पालकांचे, मुलांचे विविध खेळ घेण्यात आले. हारजीत न पाहता पालक आणि मुलांनी देखील सर्व खेळ आनंदाने खेळले. खेळासोबतच मुलांच्या पाठांतर स्पर्धा आणि चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांमध्ये विजेत्यांचे मेधाताईंनी कौतुक करून बक्षीस दिले. त्यानंतर पालकांचे मनोरंजन व्हावे म्हणून शाळेतील विद्यार्थिनींनी गाण्यावर ठेका घेत नृत्य सादर केले.

 

Scroll to Top